*७४. अभंग क्र. ४३१६*
*बोले तैसा चाले I*
*त्याचीं वंदीन पाऊलें ।।१।।*
*अंगें झाडीन अंगण I*
*त्याचें दास्यत्व करीन ।।२।।*
*त्याचा होईन किंकर I*
*उभा ठाकेन जोडोनि कर ।।३।।*
*तुका म्हणे देव I*
*त्याचे चरणीं माझा भाव ।।४।।*
जो बोलेल तसाच वागेल त्याचे मी चरण वंदीतो. त्याचं अंगण मी हाताने झाडीन, त्याचं दास्यत्व करीन. त्याचा नोकर होऊन त्याच्या समोर हात जोडून उभा राहीन. तुकाराम महाराज म्हणतात बोलतो तसं वागतो तोच देव, त्याच्या चरणी मी नतमस्तक होतो.
लोकांना फसवण्यासाठी बोलायचं वेगळं पण प्रत्यक्ष कृती मात्र त्याच्या विरुद्ध करायची असं वागणारी माणसं असतात. वैयक्तिक जीवनापासून सार्वजनिक जीवनापर्यंत सर्वत्र अशा प्रवृत्तींचा अनुभव येतो. आजची भारतीय जनता सार्वजनिक जीवनात याचा अनुभव जितक्या प्रखरतेने घेत आहे तसा गेल्या सत्तर वर्षात कधी घेतला नव्हता. हिंदूहित, हिंदुहित करत करोडो हिंदू मातीत घातले. देशप्रेम, देशप्रेम म्हणत जगातली तीन नंबरची अर्थव्यवस्था एकशे पंचेचाळीस क्रमांकावर नेऊन ठेवली. "सबका साथ, सबका विकास" म्हणत विकास केला तो फक्त हम दो हमारे दो" चाच !" दाढी वाढवायची, भगवे कपडे घालायचे, उपवासाची नाटकं करायची, गुहेत जाऊन बसायचं आणि प्रत्यक्षात सत्तेची लालसा इतकी भयंकर की कोणत्याही राज्यात विरोधी सरकारच ठेवायचं नाही. इडी, इन्कमटँक्स, सीबीआय, न्यायालयं सर्व गुलाम करुन बेकायदेशीर पद्धतीने माणसं आपल्याकडे खेचायची. कायदा, नीतीमत्ता, घटना, न्याय सर्व धाब्यावर बसवणारे आव मात्र वैराग्याचा आणतात. सामान्य जनतेला उघड फसवतात. निवडणूकीपूर्वी सैनिकांच्या "वन रँक, वन पेन्शन" आंदोलनाला पाठिंबा देणारे निवडून आल्यावर सैनिकांना पेन्शनच नाकारतात. चार वर्षांनी त्यांची सरळ नोकरीतून सुट्टी करायची योजना आणतात. यांच्या कथनी आणि करणीमध्ये जमीन-अस्मानाचं अंतर आहे. हे बोलतात तसे चालत नाहीत. "चुनावी जुमला" हा एक नवा शब्दप्रयोग त्यातून आज रुढ झाला आहे. यातून समाजाची केवढी फसवणूक होते, किती भयंकर नुकसान होतं? हे पाहिल्यावर तुकाराम महाराजांच्या *"बोले तैसा चाले । त्याची वंदीन पाऊले"* याचा अर्थ उमगतो. अशा प्रवृत्ती समाजाच्या सर्व क्षेत्रात असतात. चित्रपटात देशप्रेमाचा अभिनय करणारा नट प्रत्यक्षात कर बुडवतो. समाजसेवक समाजालाच लुटतो. महिलांना आधार देतो म्हणणारे महिलांचं शोषण करतात. बालकाश्रम चालवणारे बालकांचंच शोषण करतात. कामगार संघटना चालवणारे कामगारांनाच दहशत दाखवतात. अशा प्रवृत्ती समाजात नेहेमीच असतात. कोणत्याही भाषेत ज्या म्हणी निर्माण होतात त्या अशा अनुभवांतूनच निर्माण होतात. मराठीत एक म्हण आहे. *"खायचे दात आणि दाखवायचे दात वेगवेगळे असतात.* तोंड उघडल्यावर ज्यांचं प्रदर्शन होतं ते दात अन्न चावायचं काम करत नाहीत. जे खायचं म्हणजे अन्न चावायचं काम करतात ते दात दिसत नाहीत. साधुचा वेष धारण करणारा प्रत्यक्षात डाकू असतो. खऱ्या साधुवृत्तीच्या माणसाला साधुचा वेष करण्याचं नाटक करावं लागत नाही. माणसं असतात वेगळी भासवतात वेगळी! यावरुनच दुसरा वाक्यप्रचार रुढ झाला असावा. *"जसं दिसतं तसं ते नसतं. जसं असतं तसं ते दिसत नसतं. जसं दिसतं तसं ते नसतं म्हणून जग फसतं."*
काळ कोणताही असला तरी प्रामाणिकपणा हे मूल्य त्रिकालाबाधित आहे. माणूस आधी स्वतःशी प्रामाणिक असला पाहिजे. माणूस जगाला फसवू शकतो, पण स्वतःला कधीच फसवू शकत नाही. पण काही माणसं निर्ढावलेली असतात. त्यांना लोकांना फसवणं यात काही गैर वाटत नाही. ती चुकीचं बोलतात आणि चुकीचंच वागतात, वरुन निर्लज्जपणे ते सांगतातही. ती खोटं बोलतात आणि खोटंच वागतात. तेही *"बोले तैसा चाले"* असं वागतात. पण अशा दुष्ट, गुंड, भ्रष्ट, व्यभिचारी लोकांना उद्देशून हा अभंग नाही. जगद्गुरू तुकाराम महाराजांसारखी विभूती अशा लोकांना वंदन करील, शरण जाईल याची कल्पांतीही शक्यता नाही. उलट अशा लोकांसाठी तुकाराम महाराज हातात शब्दांचे आसूड घेऊनच तयार असतात.
तुकाराम महाराजांच्या काळातही लबाड, ढोंगी भरपूर होते. किंबहुना अशांचीच संख्या जास्त होती. ते लोक मोठमोठ्या तत्वज्ञानाच्या बाता मारायचे, चराचरात ब्रह्म भरलेलं आहे सांगायचे आणि माणसामाणसात भेद करायचे. स्त्रीयांना तुच्छ मानायचे. आपल्यासारख्याच असलेल्या माणसाला तो विशिष्ट जातीत जन्माला आला म्हणून तुच्छ, शूद्र लेखायचे. *खुद्द तुकाराम महाराजांसारख्या महान प्रज्ञावंताला, निष्कलंक चारित्र्याच्या थोर साधुपुरुषाला वारंवार कुणबी म्हणून हिनवलं जात होतं. त्यांना त्यांचा गाथा बुडवायला लावला होता. त्यांचा सातत्याने छळ केला जात होता. त्यांनी हाती घेतलेलं काम सोडून द्यावं, त्यांनी आपलं तोंड बंद करावं, आपल्या लेखणीला कायमचा विराम द्यावा यासाठी सर्व मार्गांनी दबाव आणला जात होता. पण तुकाराम महाराज "जालो जीवांसी उदार । तेथे काय भीडभार ।।" म्हणून भिंतीला पाठ लावून लढतच राहिले.*
"जग माया आहे. कितीही कमावलं तरी, इथून वर जाताना सोबत काही नेता येत नाही. इथेच सोडून जावं लागतं. जन्माला येतांना मूठ वळलेली असते, पण जाताना हात सताड पसरलेले असतात. *"मुठ्ठी बांध के आनेवाले हाथ पसारे जायेगा । इस नाचिज दुनियासे तुने क्या पाया क्या पायेगा ।।"* असं म्हणणारे सतत आपल्या झोळ्या भरतच राहतात. त्यांची झोळी कधीच भरत नाही. त्यांची हाव कधीच पूर्ण होत नाही. पण लोकांना सांगतात हा पैसा, अडका, जमिनजुमला सर्व मिथ्या आहे, माया आहे. एकदा एक सद्गृहस्थ भेटले. म्हणाले माऊली माझ्याकडे टू व्हिलरपासून फोर व्हिलरपर्यंत सर्व गाड्या आहेत. माझी गाडी वेगळी, बायकोची वेगळी, मुलांना त्यांच्या त्यांच्या गाड्या आहेत. दोन हजार स्क्वेअर फूटाचा बंगला आहे. शेतीबाडी, बागायती कसलीच कमतरता नाही. मोठा पसारा आहे पण त्यात काही अर्थ नाही. ही सगळी माया आहे. आपण वेळ आली तर पायीही फिरतो. त्यांना विचारलं की ही जर सर्व माया आहे तर जमवली का? आयुष्यभर एवढं जमवलं आणि आता म्हणता की माया आहे. मग वाटून का टाकत नाही. अजूनही तिच्यात कशाला गुंतून पडला आहात? ते म्हणतात, "अहो, मला त्याचं काही कौतुक नाही. आहे म्हणून आहे!" या माणसाला हसावं की रडावं?
महाराष्ट्रात सद्या खोके खूप गाजत आहेत. तोंडाने म्हणतात, हिंदुत्वासाठी हे सर्व केलं. इडीच्या डोळ्यावर येण्याइतकं घबाड आयुष्यभर कमवलं तेही काय हिंदुत्वासाठी? दुनियेला दिसतं आहे की आपली कातडी वाचवण्यासाठी, सत्ता आणि मत्ता कमवण्यासाठीच सर्व सुरु आहे. पण बोलणार मात्र हिंदुत्वाच्या गप्पा ! हे व्यक्तिगत पातळीवर असतं तोवर फार नुकसान होत नाही. पण हे जेव्हा सार्वजनिक पातळीवर घडतं तेव्हा ते फार नुकसानकारक असतं. म्हणून प्रामाणिकपणा हे फार महत्वाचं मूल्य आहे.
*तुकाराम महाराजांना ज्या क्षणी प्रस्थापित पिढीजात सावकारी, त्यातून शोषणातून मिळणारं ऐश्वर्य याचं भान आलं त्याक्षणी त्यांनी आपल्याकडे असलेली गहाणखतं नदीत सोडून दिली.* पण सावकारी बंद केली तरी लोकांना मदत देणं बंद केलं नाही. दुष्काळात सर्व धान्य लोकांना वाटून टाकलं. तुकाराम महाराजांनी संसार सोडला नाही. लोकांना जग माया आहे, धनदौलत माया आहे, तिच्याकडे पाठ फिरवा असं सांगितलं नाही. उलट, *"जोडोनिया धन उत्तम व्यवहारें । उदास विचारे वेंच करी ।।"* असा सल्ला दिला. कष्ट करुन जगायला सांगितलं आणि स्वतः तसेच जगले. *"भिक्षा पात्र अवलंबणे । जळो जिणे लाजिरवाणे।।"* असं सांगणाऱ्या तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवरायांनी आदराने पाठवलेला नजराणासुद्धा, *"सोने आणि माती । आम्हा समान हे चित्ती ।।"* असं म्हणून परत पाठवला आणि *"तुम्हांपासी आम्हा येवोनिया काय । वृथा सीण आहे चालण्याचा ।।"* म्हणून शिवरायांच्या दरबारचं निमंत्रणही नम्रपणे नाकारलं. "इतुकी वर्षे आपले देशी वास्तव्य केले, परंतु आमची दखल घेतली नाही": अशी तक्रार करणाऱ्या रामदासाच्या तुलनेत जगद्गुरू तुकाराम महाराजांचं वैराग्य ठळक उठून दिसतं.
*महात्मा गांधीजींनी रात्रीच्या रेल्वे प्रवासात टाँलस्टायचं 'अन टू धीस लाँस्ट' वाचलं आणि सकाळी वार्षिक ७५ हजार पौंडाची प्रँक्टीस सोडून दिली आणि टाँलस्टाय फाँर्म स्थापन करुन कुटुंबासह तिथे रहायला गेले. नंतरच्या काळात गांधीजींनी खाजगी मालमत्ता नावाची गोष्टच ठेवली नाही.* जगद्गुरू तुकाराम महाराज, महात्मा गांधी यासारख्या लोकांना आपल्या तत्वनिष्ठेची जबर किंमत द्यावी लागते. गांधीजींचा मुलगा हरिदास त्यामुळे त्यांच्यापासून कायमचा दुरावला. या दोघांच्या कुटुंबाला त्यांच्या तत्वनिष्ठेची किंमत चुकवावी लागली. *तुकाराम महाराजांचं शेत जप्त झालं, परंपरागत मंदिर त्यांच्याकडून हिसकावून घेण्यात आलं. तुकाराम महाराजांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाला देहूतून परागंदा होवून वीस-बावीस वर्षे दूरच्या गावात लपून, छपून रहावं लागलं.* पण ज्यांनी संकुचित कुटुंबाचा परिघ ओलांडलेला असतो ते अशा गोष्टींची तमा बाळगत नाहीत.
*संत गाडगेबाबांचं कीर्तन सुरु होतं. बातमी आली. त्यांच्या मुलाचं निधन झालं होतं. दुसऱ्याच क्षणी "असे गेले कोट्यानुकोटी । काय रडू एकासाठी ।।" म्हणून गाडगेबाबांनी कीर्तन सुरुच ठेवलं. तुकाराम महाराज, महात्मा गांधी, गाडगे बाबा 'वसुंधैव कुटुंब' ही कल्पना प्रत्यक्षात जगले.* पण अशी, जसं बोलतात तसं वागणारी माणसं समाजात फार कमी असतात. मोठमोठ्या गप्पा मारायच्या आणि वेळ आल्यावर शेपूट घालायचं, माघार घ्यायची असे लोक चेष्टेचा विषय बनतात. पण काही लोक असेही असतात जे जसं बोलतात तसंच वागतात. आपल्या मूल्यांवर ठाम असतात. त्यासाठी कसलीही किंमत द्यायची वेळ आली तरी माघार घेत नाहीत. लोक काय म्हणतील, आपण जे करतो आहोत त्याचे भावी परिणाम काय होतील, आपल्याला त्याची काय किंमत द्यावी लागेल याचा विचार करून हाती घेतलेलं काम सोडून देत नाहीत.
*महात्मा जोतीराव फुल्यांनी शिक्षणाची महती सांगितली. त्यांनी मुलींसाठी, अस्पृश्यांसाठी शाळा सुरु केल्या. त्यांनी ते काम बंद करावं यासाठी काही समाजकंटकांनी त्यांच्या वडिलांना भडकावलं आणि महात्मा जोतीराव फुल्यांना घरातून बाहेर काढायला भाग पाडलं. महात्मा फुले आणि सावित्रीमाई नेसत्या वस्त्रानिशी घराबाहेर पडले पण त्यांनी आपलं कार्य थांबवलं नाही. महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीमाई यांनी ब्राह्मण बालविधवा स्त्रीयांसाठी आश्रम काढला. तेव्हा दुष्ट सनातन्यांनी त्यांच्यावर मारेकरी घातले. तरीही महात्मा फुले विचलित झाले नाहीत. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यांसाठी काम सुरु केलं तेंव्हा त्यांची लोकांनी महार शिंदे म्हणून हेटाळणी केली. महर्षी सर्व कुटुंबकबिला घेऊन महार वस्तीत रहायला गेले, पण त्यांनी काम सोडलं नाही. राजर्षी शाहू महाराज यांनी शूद्रातीशूद्रांना आपल्या राज्यात राखीव जागा ठेवल्या. तेंव्हा दुष्ट सनातनी ब्राह्मणांनी छत्रपती शाहू महाराजांच्याही खुनाचे प्रयत्न केले. त्यांच्या मुलीच्या लग्नात बाँम्ब टाकले. पण शाहू महाराज आपल्या कार्यापासून यत्किंचितही विचलित झाले नाहीत.* आपल्या शब्दांमागे कृतीचं सामर्थ्य उभं करणारे खरोखरच फार थोर असतात. अशा लोकांप्रती जगद्गुरू तुकाराम महाराजांना अतीव आदर होता. म्हणूनच त्यांचं दास्यत्व स्वीकारण्याची त्यांची तयारी, म्हणजे त्यांच्यापुढे नम्र होण्याची, नतमस्तक होण्याची तयारी त्यांनी या अभंगातून व्यक्त केली आहे. खरं तर *स्वत: तुकाराम महाराजच ‘बोले तैसा चाले’.. या कोटीचे महापुरुष होते. आपल्या स्वीकृत मूल्यांसाठी त्यांनी अपार छळ, यातना, अवहेलना सहन केली. दु:खितांचं दु:ख हरण्यासाठी, शोषितांचं शोषण थांबवण्यासाठी, लोकांना घातक रूढी-परंपरातून बाहेर काढण्यासाठी, धार्मिक गुलामगिरीत हजारो वर्षांपासून जखडलेल्या समाजाला मुक्त करण्यासाठी, खुळ्या समजुती, आचार-विचार यापासून समाजाची मुक्तता करण्यासाठी जगद्गुरू तुकाराम महाराज प्राण पणाला लावून लढले. माघार घेतली नाही.* म्हणूनच आजही तुकाराम महाराजांचं नुसतं नाव घेतलं तरी हजारो माना नतमस्तक होतात. आपण बोलतो तसं वागलं वागलं पाहिजे हा संदेश तुकाराम महाराजांनी या अभंगातून दिला आहे, तसाच आपल्या जीवनातून दिला आहे.