नवमहाराष्ट्र विद्यालय खराबवाडी
हे ही पहा बोधकथा संस्कार मोती
हे ही पहा👇👇👇👇👇👇👇👇
बोधकथा शृंखला
*लोभाचे बळी*
*एकदा एका व्यक्तीने घरी कार्यक्रमाचे आयोजन केले आणि त्यासाठी त्याने नातेवाईक, शेजार्यांना आमंत्रित केले होते, कारण अशा वेळेला भोजनासाठी अधिक भांड्याची गरज भासते. त्या व्यक्तीने आपल्या सर्व शेजार्यांकडून भांडी मागवली आणि सर्वांना जेवण दिले. दुसर्या दिवशी जेंव्हा शेजार्यांची भांडी परत केली तेंव्हा त्याने त्या भांड्यासोबत एक छोटे भांडे दिले. जेंव्हा शेजार्याने याचे कारण विचारले तेंव्हा त्याने म्हटले की "काल रात्री तुमच्या भांड्याने छोट्या भांड्यास जन्म दिला. त्यामुळे ही छोटी भांडी मी कशी ठेवून घेवू?" शेजारी प्रसन्न झाले. त्यांना आयतेच प्रत्येक भांड्याबरोबर एक लहान भांडे मिळाले होते. काही दिवसानंतर तोच माणूस जेव्हा आपल्या येथे भोजन आहे असा बहाणा करून शेजा-यांकडे भांडी मागण्यासाठी गेला तेव्हा शेजा-यांनी त्याला मोठया आनंदाने भांडी दिली. कारण शेजा-यांना याचा पूर्वानुभव होताच. काही जणांनी तर याला घरातील एकूण एक भांडी दिली. दुसर्या दिवशी त्या भांडे मागून नेणा-या व्यक्तीने भांडी परत केली नाहीत तेंव्हा सर्व लोक त्याच्या घरी आले आणि त्याला विचारू लागले की आमची भांडी कोठे आहेत. तेव्हा त्याने रिकामी खोली उघडून दाखविली व म्हणाला,’’ सर्व भांडी ईश्र्वराने नेली. सर्व भांडी मृत पावली. मी आता कोठून तुमची भांडी परत देऊ’’ सर्व लोक डोक़याला हात लावून बसले. कारण पहिल्यांदा जेव्हा त्याने भांडी नेली तेव्हा त्यासोबत एक भांडे जास्त दिले, तेव्हा लोभामुळे कोणी त्याला विरोध केला नाही, आता सर्वच भांडी गेली.*
*तात्पर्य- लोभाला बळी पडून आपण चुकीच्या गोष्टीला विरोध करत नाही मात्र जेव्हा हानी होते तेव्हा मात्र आपण विरोध करतो. लोभ हा सर्वथा वाईट आहे.*
*📚हे हि दिवस जातील 📚*
💢 एकदा एक राजा आपल्या महालात बसला होता. तेवढ्यात त्याला प्रधान येताना दिसला. प्रधान राजाजवळ आला, त्याने राजाला प्रणाम केला व राज्याच्या कारभाराविषयी दोघेही चर्चा करू लागले. थोड्यावेळाने एक द्वारपाल तेथे आला व म्हणाला,’’महाराज, द्वारावर एक संन्याशी आला आहे व तो आपल्या भेटीची वेळमागत आहे.’’ राजा संत, महात्मे, फकीर यांची कदर करणारा होता. राजाने द्वारपालाला संन्याशीमहाराजांना घेवून येण्यास सांगितले. द्वारपाल संन्याशी महात्म्याला घेऊन राजाकडे आला. महात्मा येताच राजाने स्वत: उठून त्यांना नमस्कार केला. आस्थेने विचारपूस केली. त्यांचा यथायोग्य सत्कार केला व त्यांना उपदेश करण्याविषयी सांगितले. संन्याशी महाराज म्हणाले,’’राजन, तुम्ही तुमचे राज्य अतिशय उत्तम पद्धतीने चालवित आहात, सर्व प्रजा सुस्थितीत आहे, सुखी आहे, कोणाचे कोणाशी भांडणतंटा नाही, सर्वधर्माचे लोक आनंदाने राहत आहेत, अन्नधान्य, पशूपक्षी सगळयात बरकत आहे. हे पाहून मला आनंद वाटतो’’ राजा म्हणाला,’’ महाराज ही स्तुती माझी एकटयाची नसून माझ्या सर्व सहका-यांची पण आहे. महाराज, ही स्तुती बाजूला ठेवून आपण मला भविष्यकाळासाठी काही उपदेश करावा अशी विनंती आहे.’’ संन्याशी महाराज म्हणाले,’’राजा, सदासर्वकाळ एकच परिस्थिती राहत नसते, त्यामुळे तुला फक्त एकच वाक्याचा मी उपदेश करतो. तो म्हणजे ‘’ हे ही दिवस जातील’’ एवढेच तु लक्षात ठेव’’ एवढे बोलून ते तेथून निघून गेले. राजा विचारात पडला, प्रधानाने हे पाहिले व तो म्हणाला,’’ महाराज, अहो संन्याशीमहाराजांनी केलेला उपदेश आपण फक्त लक्षात ठेवा म्हणजे झाले.’’ पण राजाची तगमग काही थांबेना, कारण एवढी सुबत्ता, समृद्धी असताना संन्याशाने आपल्याला हे ही दिवस जातील असे का म्हटले याचा त्याला उलगडा होईना. राजा रात्रंदिवस याच विचारात गढून गेला.
काही दिवसातच दुस-या राजाने या राजाच्या राज्यावर स्वारी केली. राजा युद्धाच्या तयारीत कमी पडल्याने व परक्या राजाचे सैन्य आक्रमणावर आक्रमणे करीत राहिल्याने हा राजा हरला व त्याला बंदीवान करून त्या राजापुढे नेण्यात आले. तेथील राजाने या राजाला कारागृहात टाकले. कारागृहात अंधार कोठडीत कोणीच नसे. राजा एकटा निराश, हताश बसून राहत असे व आपल्या पूर्वीचे वैभव आठवित असे. त्यातच त्याला एक दिवशी संन्यासी बाबाबरोबर झालेली भेट आठविली व उपदेशही. झाले, त्या उपदेशाने राजाला आशा दाखविली, हे ही दिवस जातील, राजा निराशेकडून आशेकडे वळला आणि त्या दिवसापासून तो आनंदी राहू लागला. कारागृहाच्या सैनिकांना याचे कारण कळेना की कारागृहात कैदी म्हणून राहणारा राजा आनंदी कसा काय राहतो, त्यांनी त्यांच्या राजाला कळविले, तो राजाही विचारात पडला हे कसे काय साध्य झाले. त्याने या राजाला विचारले असता या राजाने संन्याशी महाराजांशी झालेली भेट व ‘हे ही दिवस जातील हा उपदेश सांगितला. त्याने हा उपदेश ऐकताच त्याला ही जाणीव झाली की आपणही एक राजा आहोत व आपल्यावरही ही वेळ येऊ शकते. हे जाणून त्याने राजाची मुक्तता केली, तसेच त्याचे राज्य त्याला परत दिले व मोठ्या सन्मानाने त्याला परत पाठविले.
तात्पर्य- विचारांमध्ये ताकद असते, एखादा विचार मानवाचे आयुष्य बदलून टाकू शकतो.
*विजय असो*
*एकदा एका गावात दोन कोंबड्यांची झुंज सुरु झाली. भांडणाचे कारणही तसे भारीच होते, एका कोंबडीशी कुणी लग्न करायचे यावरून त्या दोघांत खूप भांडणे झाली व त्याचे पर्यवसान झुंजीत झाले. अटीतटीच्या झुंजीत दोघेही एकमेकांवर प्रहार करू लागले.*
*मारामारीत दोघांचेही अंग रक्तबंबाळ झाले, त्यातील एकाने मग रक्तबंबाळ झाल्याने सरळ पळून जाऊन आपल्या खुराड्याचा आधार घेतला व तिथूनच तो आणि ती कोंबडी बाहेर काय चालले आहे हे पाहू लागले.*
*भांडणात खुराड्याच्या बाहेर असलेल्या कोंबड्याला हा आपला विजय वाटून त्याने घराचे छत गाठले व तिथून जोरजोराने त्या कोंबडीकडे बघून ''मी जिंकलो, मी जिंकलो'' असे ओरडू लागला, स्वत:चाच जयघोष करू लागला.*
*तेवढ्या वरून एक गरूड आला व त्याने त्या ओरडणा-या कोंबड्याला उचलले व लांब जाऊन त्याने त्याला मारून खाऊन टाकले. हे पाहिल्यावर पराभूत झालेला कोंबडा व कोंबडी बाहेर आले तेव्हा तो कोंबडा कोंबडीला म्हणाला,''मी जर बाहेर राहिलो असतो तर त्या कोंबड्यासारखीच माझी हालत झाली असती. मी माझ्या जीवाला जसा जपतो तसाच तुलाही जपेन.''*
*तात्पर्य: ज्याच्या डोक्यात यशाची हवा चढते तेव्हाच त्याच्या पराजयाची सुरुवात होते. यश पचविता येणे ही एक मोठी गोष्ट आहे.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*उपदेश*
*एकदा गौतम बुद्ध भ्रमण करीत एका गावात आले. त्या गावातील मुख्य व्यक्ती बुद्धांना पसंत करत नसत. जेव्हा त्याना माहिती झाले की, बुद्ध आपल्या शिष्यांसोबत गावात येत आहे तेव्हा त्याने गावातील लोकांना आदेश दिला की, आपल्या घराची दारे बंद ठेवा आणि बुद्धांना भिक्षा देऊ नका. बुद्ध त्या व्यक्तिच्या स्वभावाला ओळखून होते. मार्गात जेव्हा त्याचे घर आले तेव्हा ते दरवाजात उभे राहून भिक्षा मागू लागले. बुद्धांचा आवाज ऐकून तो मुख्य व्यक्ती नाराज झाला आणि म्हणू लागला,’’ तुम्ही येथून निघून जा, कामधंदा काही करत नाही आणि भिक्षा मागून पोट भरता. कष्टाचे काम करायला शिका आणि पोट भरा.’’ बुद्ध गुपचुप त्याचे अपमानास्पद बोलणे ऐकत होते. त्याचे बोलणे संपल्यावर बुद्ध म्हणाले,’’ माझ्या एका शंकेचे आपण समाधान करा. आपल्या घरी येऊन जर काही खाण्यासाठी मागत असेल, आपण ताट सजवून आणले मात्र त्यानंतरही तो ते न स्वीकारताच निघून गेला तर तुम्ही त्या खाद्यपदार्थाचे काय कराल?’’ ती व्यक्ती म्हणाली,’’ मी ते नष्ट करणार नाही आणि घरात ठेवून देईन’’ तेव्हा बुद्ध म्हणाले,’’ त्या दशेनुसार आपले सामान आपल्याजवळच राहिले ना? त्याचप्रमाणे आपल्या घरी येऊन आम्ही भिक्षा मागितली आणि बदल्यात आपण आम्हाला अपशब्द वापरले. भिक्षेत दिलेले हे शब्द आम्ही अस्वीकार केले. त्यामुळे ते तुमच्याजवळच राहिले.’’ मुख्य व्यक्तीला आपली चूक उमगून आली. बुद्धांची त्याने क्षमा मागितली. तो त्यांचा शिष्य बनला.*
*तात्पर्य- उग्रपणाने वागल्यास होणा-या कामात अडथळा निर्माण होतो आणि संयमाने वागल्यास न होणारे कामसुद्धा पटकन होऊन जाते.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*भिकारी आणि त्याचा कुत्रा*
*एक भिकारी व त्याचा कुत्रा एका सरदाराच्या बंगल्यासमोर बसले होते. स्वयंपाकीण बाईने काही भाकरीचे तुकडे बाहेर आणून टाकले. इतक्यात त्या सरदारांच्या बरोबर बसून नेहमी जेवणार्या एका गरीब आश्रिताचे लक्ष तिकडे जाऊन, तो ते काय करतात हे पाहण्यासाठी क्षणभर थांबला. इकडे त्या भुकेल्या अधाशी भिकार्याने त्यातले काही तुकडे स्वतः खाल्ले व बाकीचे तुकडे आपल्या निरनिराळ्या मुलांसाठी वाटे करून ते आपल्या धोतराच्या पदरात बांधून घेतले. एक अगदी वाळलेला लहानसा भाकरीचा तुकडा त्याने आपल्या कुत्र्याला दिला. तो प्रकार पाहून सरदाराचा आश्रित आपल्याशीच म्हणाला, 'या कुत्र्याच्या नि माझ्या स्थितीत कितीतरी साम्य आहे ! आपणास काहीतरी खायला मिळेल, या आशेनं हा कुत्रा आपल्या मालकाच्या तोंडाकडे पाहत बसतो आणि सरदार मला एखादी नोकरी देतील, या आशेनं मी त्यांच्यावर अवलंबून राहतो. परंतु या भिकार्याला आपल्या कुटुंबातल्या माणसांचा चरितार्थ अगोदर चालवावा लागत असल्यामुळे आपल्या कुत्र्याला पोटभर खाऊ घालणं त्याला जसं जमत नाही, तसं आपल्या नातेवाईकांना आधी नोकरी द्यायची असल्यामुळे, माझी सोय सरदारांना अर्थातच करता येत नाही.'*
*तात्पर्य :प्रत्येक माणुस आपल्या जवळच्या नातेवाईकांची जितकी काळजी घेतो, तितकी आश्रितांची किंवा मित्रांची घेत नाही.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*
*अपशकुनी*
*दिल्ली शहरात हिराचंद या नावाचा एक व्यापारी होता. सकाळी त्याच तोंड पाहिलं की दिवस वाईट जातो, असा त्याच्याविषयी लोकांचा दृढ समज झाला होता. अकबर बादशहाच्या कानी ही गोष्ट जाताच त्यानं या गोष्टीची प्रचीती घेण्यासाठी, एकदा त्याला सकाळी सकाळीच आपल्या वाड्यावर बोलावून घेतले. योगायोग असा की, हिराचंद राजवाड्यातून निघून जाताच बादशहाच्य बेगमला सणसणून ताप भरला. स्वत: बादशहालाही अधूनमधून चक्कर येऊ लागल्यासारखं वाटून, त्याचा तोल जाऊ लागला, आणि त्यामुळं हकिमानं त्याला लंघन करण्याचा सल्ला दिला. दुपारपर्यंतचा काळ असा निघून गेला, आणि उन्हं ओसरताच राजस्तानातल्या एका राजाची बादशहानं जिंकून घेतलेला प्रदेश, पुन्हा त्या राजानं जिंकून घेतल्याची वाईट बातमी एका जासुदानं येऊन बादशहाला दिली.‘हा सर्व सकाळी सकाळीच झालेल्या हिराचंद व्यापाऱ्याच्या अपशकुनी दर्शनाचाच प्रताप आहे,’ असा समज होऊन, बादशहान त्याल फ़ाशीची शिक्षा फ़र्माविली. हिराचंदने बिरबलाची घेतली व आपले रक्षण करण्याची त्याच्याकडे याचना केली. बिरबलाने त्याला निश्चींत रहायला सांगितले. दुसऱ्या दिवशी अगदी सकाळी वेषांतर करुन, रस्त्याच्या कडेला जाऊन बसला, नित्याप्रमाणे बादशहा त्या रस्त्याने फ़िरायला जाऊ लागला. बादशहाला दुरुन येताना पाहताच बिरबल पळून जाऊ लागला. सेवकांनी त्याला पकडून बादशहाकडे हजर केले. बादशहानं पळण्याचं कारण विचारताच बिरबल म्हणाला, ‘खाविंद, काल सकाळी त्या हिराचंद व्यापाऱ्याचं दर्शन झाल्यामुळं आपला व आपल्या बेगमसाहेबांचा नुसता दिवसच वाईट गेला, पण आपलं दर्शन सकाळी झाल्यामुळे, त्या बिचाऱ्या हिराचंदावर मात्र फ़ाशी जाण्याचा प्रसंग आला आहे. तेव्हा त्या हिराचंदच्या दर्शनापेक्षा, आपलं सकाळी होणारं दर्शन हे कितीतरी पटीनं अधिक वाईट असल्यामुळे, ते टाळण्यासाठी मी पळून जात होतो.’ बादशहाने बिरबलाचे हे शब्द ऎकून जसे त्याला ओळखले, तशीच त्याने आपली चूकही ओळखली व हिराचंदला फ़र्मावलेली फ़ाशीची शिक्षा रद्द केली.*
*तापर्य- शकुन अपशकुन असे काहीही नसते.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*खरे दुःख*
*एक सोनार होता. त्याच्या दुकानासमोरच एका लोहाराचे दुकान होते. सोनार जेव्हा काम करत असे तेंव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज होत असे पण जेंव्हा लोहार काम करत असे तेंव्हा मात्र लोखंडाचे काम होत असल्याने मोठा आवाज होत असे. तो आवाज मोठा कर्णकर्कश असे. एके दिवशी सोनाराच्या दुकानातील एक सोन्याचा कण कसा कोण जाणे पण लोहाराच्या दुकानात जावून पडला. त्या सोन्याच्या कणाची भेट एका लोखंडाच्या कणाशी झाली. खूप दिवसांची ओळख असल्यासारखे ते एकमेकांशी बोलू लागले. सोन्याच्या कणाने लोखंडाच्या कणाला म्हंटले,"दादा, आपले दुःख तर खरे एकसमान आहे. दोघानाही आगीत तापवले जाते आणि हातोड्याने ठोकले जाते. मी तर बाबा चुपचाप हे सहन करतो, पण तुझे काय?" लोखंडाचा कण सोन्याच्या कणाकडे पाहून दुःखी स्वरात म्हणाला,"अरे ! तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. दोघानाही तापवणारी आग एकच आहे आणि ठोकणारा हातोडाहि एकाच धातूचा आहे. पण खरे दुःख याचे आहे कि तुला ठोकणारा हातोडा हा तुझा कोणीच लागत नाही पण मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा हा नात्याने माझा भाऊच लागतो. दुसऱ्याने दिलेल्या दुःखापेक्षा स्वकीयांनी दिलेला त्रास हा अगदी हृदयात वार करून जातो."*
*तात्पर्य- आपल्या माणसांकडून होणारा त्रास हा कायमच दुःखदायक वाटतो.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*📚मी चा त्याग 📚*━━━━━━━━━━━━━━━━
💢 एका विख्यात संताला भेटण्यासाठी एक राजा आला आणि म्हणाला,’’ तुम्ही मला त्या स्थितीमध्ये घेऊन जा, ज्या स्थितीमध्ये तुम्ही आहात.’’ संताने म्हटले,’’ महाराज मी तुम्हाला त्या अवस्थेत निश्र्चित घेऊन जाईन, पण माझी एक अट आहे. उद्या पहाटे चार वाजता तुम्ही एकटे माझ्या कुटीवर या.’’ राजा म्हणाला,’’ ठीक आहे.’’ दुस-या दिवशी पहाटे राजा कुटीवर आला, राजाने कुटीच्या दारापाशी येताच संताच्या नावाने हाक मारली. त्याबरोबर आत जागे असणा-या संतांनी विचारले की कोण आले आहे, राजाने सांगितले,’’ मी राजा आलो आहे’’ संतांनी सांगितले की उद्या या. राजाला विचित्र वाटले पण तो तेथून निघून गेला. दुस-या दिवशी पहाटे चार वाजता राजा एकटा पुन्हा कुटीपाशी गेला, त्याने हाक मारली, संतांनी तोच प्रश्र्न विचारला, राजाने यावेळी उत्तरात सुधारणा केली कारण मी राजा आलो आहे हे वाक्य संतांना आवडले नसेल म्हणून राजाने सांगितले,’’ मी आलो आहे’’ संतांनी सांगितले, उद्या या. तिसरे दिवशी राजा पुन्हा गेला, दोन दिवसांप्रमाणेच घडले यावेळी राजाने उत्तर दिले, ‘’मी आहे’’ संतानी पुन्हा उद्या या असे सुनावले. राजा चौथ्या दिवशी मात्र विचारात पडला आता जावे की नको कारण संत काहीही उत्तर दिले हाकलून देतात, त्यापेक्षा न जाणेच बरे या विचारात होता. मात्र आता तीन दिवस हाकलून दिले आहे, आता चौथ्या दिवशी जाऊन बघु. चौथ्या दिवशी पण राजा गेला, त्याने संतांच्या नावाने हाक मारली, संतांनी आतूनच विचारले, कोण आहे, मात्र यावेळी राजाला काय उत्तर द्यावे हे सुचले नाही. तो गप्प राहिला. मग काही क्षणातच आतून संत बाहेर आले, त्यांनी राजाला जवळ घेतले, घट्ट मिठी मारली आणि म्हणाले, ‘’राजन तुम्ही परीक्षेत उत्तीर्ण झालात, पहिले तीन दिवसात तुमच्या उत्तरात तुम्ही ‘मी’ आलो असे उदगार काढले पण मी तर तुम्हाला एकट्यानेच बोलावले होते. तुम्ही तुमच्या मी पणाला बरोबर घेऊन आलात. मानवीजीवनात या मी पणाला काहीही स्थान नाही. मी पणा सोडला की खूप काही शिकावयास मिळते’’
तात्पर्य- मानवाने ‘’मी’’ पणा सोडल्यास खूप काही प्राप्त होते. ‘ मी’ पणाचा मृत्यू ज्यादिवशी मानवातून होतो तो त्यादिवशी संतत्वाकडे वाटचाल करू लागतो.
*ज्ञान*
*आद्यगुरु शंकराचार्य हिमालयाकडे यात्रेसाठी चालले होते. त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व शिष्य हि होते. प्रवास करता करता ते अलकनंदा नदीच्या पात्रापाशी येवून थांबले. तेंव्हा एका शिष्याने शंकराचार्यांची स्तुती करण्यास सुरुवात केली. शिष्य म्हणू लागला,"आचार्य ! आपण किती महान आहात, आपले ज्ञान किती मोठे आहे जणू या अलकनंदा नदीच्या पात्राप्रमाणे. हे पात्र जितके विस्तीर्ण आहे तितके तुमचे ज्ञान असावे असे मला वाटते. कदाचित यापेक्षा महासागराइतकेही तुमचे ज्ञान असू शकेल."त्याचवेळी शंकराचार्यांनी आपल्या हातातील दंड पाण्यात बुडवला आणि बाहेर काढला, शिष्य या कृतीकडे पाहत होता. पाण्यातून बाहेर काढलेला दंड शिष्याला दाखवून शंकराचार्य म्हणाले," बघ, किती पाणी आले या दंडावर? एक थेंब इतकेच ना! अरे! मला किती ज्ञान आहे ते सांगू का? जगातील ज्ञान म्हणजे अलकनंदा नदीचे पात्र आहे असे समज आणि दंड बुडवून बाहेर काढल्यावर त्यावर आलेला थेंब म्हणजे माझे ज्ञान." जगात प्रचंड ज्ञान आहे आणि त्यातील केवळ एक थेंब ज्ञान माझ्याकडे आहे असे आद्यगुरु शंकराचार्य म्हणतात.*
*तात्पर्य : आपल्या जवळील ज्ञानाचा गर्व करू नये.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
उपकार स्मरण करणे हेच माणसाचे कर्तव्य आहे !*
*एकदा एक श्रीमंत माणूस नदीकाठावरील मारूती मंदिरात देवदर्शनासाठी गेला. अचानक त्याच्या मनात आले, नदीत जाऊन हात-पाय धुवावेत व मग मंदिरात देवदर्शनासाठी जावे. तो नदीवर गेला. हात-पाय धूत असताना त्याच्या तोल गेला आणि तो नदीत पडला. त्याला पोहता येत नव्हते. त्याची धडपड सुरू झाली. तो ओरडू लागला पण त्याला वाचविण्यासाठी कुणीही पुढे येईना.*
*अखेर एका साधूने नदीत उडी घेतली. त्या साधूने त्याला वाचविले. काठावर आणले. काही वेळाने तो श्रीमंत गृहस्थ भानावर आला. त्याने खिशातून खूप नोटा बाहेर काढल्या. पण त्यातील फक्त एक रूपयाची नोट साधूच्या हातावर ठेवली. हे पाहून काठावर जमलेले लोक संतापले. चिडून त्यांना थांबविले. त्यांनी त्या व्यापार्याला उचलले व नदीत टाकणार इतक्यात साधूने त्यांना थांबविले. साधू म्हणाला, ‘थांबा, त्यांने स्वत:च किंमतीएवढेच बक्षिस दिले. यात त्याची काय चूक? त्याची किंमत एवढीच आहे.’*
*तात्पर्य - माणसाची खरी किंमत प्रसंगानेच कळते. उपकारकर्त्याचे उपकार स्मरणे हे माणसाचे पवित्र कर्तव्य आहे.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*📚 एकाग्रता 📚*━━━━━━━━━━━━━━━━
💢 एकदा एक स्वामीजी काही मुलांचे निरीक्षण करत होते. ती मुले पुलावर उभे राहून नदीवर तरंगत जाणार्या अंड्याच्या टरफलावर बंदुकीने नेम साधण्याचा प्रयत्न करत होती.पाण्यामुळे ती टरफले वर-खाली होत होती. मुलांना त्यांच्यापैकी एकही टरफलावर नेम धरता आला नाही. त्यांनी अनेक वेळेला बंदूक झाडली पण प्रत्येकवेळी त्यांचा नेम चुकत राहिला. त्यांच्याकडे बराच वेळ स्वामीजींचे लक्ष होते. मुलेही हे पाहत होती. मुलांनी स्वामीजींना म्हटले," तुम्ही नुसतेच आमच्याकडे काय पाहत आहात? का आम्हाला नेम धरता येत नाही असे तुम्हाला वाटते? आणि असे असेल तर तुम्ही नेम धरून ती टरफले फोडून दाखवा. तुम्हाला जर असे वाटत असेल की तुम्हाला आमच्यापेक्षा अधिक चांगले जमते असे वाटते का?" स्वामीजी हसले आणि म्हणाले," मी प्रयत्न करून पाहतो." मुले म्हणाली," तुम्हाला वाटते तितके ते सोपे नाहीये." स्वामीजींनी बंदूक हातामध्ये घेतली आणि त्या अंड्याच्या टरफलावर नेम धरला, काही मिनिटे निश्चल राहिले, मग त्यांनी बंदूक चालवली, त्यांनी बारावेळा गोळ्या झाडल्या आणि बारावेळेला अंड्यांची टरफले उडविण्यात स्वामीजींना यश आले. त्या मुलांना फारच आश्चर्य वाटले,"एखादा माणूस पाण्यातील वाहणार्या अंड्याच्या टरफलावर इतका अचूक कसा नेम साधू शकतो?" असा प्रश्न त्यांना पडला. स्वामीजींनी मुलांच्या मनातील हे ओळखले, त्यांना ती मुले आवडली होती. ते म्हणाले,’’ जे काही तुम्ही करत होता त्यावर तुमचं मन एकाग्र करा. नेमबाजी करा किंवा अन्य काही. तुमचं लक्ष फक्त लक्ष्यावरच पाहिजे. तुमचा नेम कधीच चुकणार नाही. एकाग्रतेने बरेच काही साध्य करता येते. अवघड वाटणा-या गोष्टीसुद्धा या एकाग्रतेने सहजसाध्य होतात.’’ मुले स्वामींजींपुढे नतमस्तक झाली.
तात्पर्य- एकाग्रता ही मानवी मनाचा मोठा दागिना आहे.त्याचा बहुतांश वेळेला वापर होत नाही. तो जर वापरला गेला तर अनेक गोष्टी साध्य करता येतात. ध्येय प्राप्तीसाठी एकाग्रता खूप महत्वाची आहे
*🐴घोडा आणि नदी🌊*
*एकदा एका माणसाला त्यच्या घोड्यासमवेत एक नदी पार करायची असते. परंतु त्याला नदीची खोली माहीत नसल्याने तो तिथेच काठावर विचार करत बसतो. मदतीसाठी आजुबाजुला पाहत असताना त्याला तेथे एक लहान मुलगा दिसतो. तेव्हा त्या माणसाने लहान मुलाला नदीच्या खोलीबद्दल विचारले.मुलाने घोड्याकडे एकदा पाहीले आणि क्षणभर थांबुन तो विश्वासाने म्हणाला, " निश्चींतपणे जा, तुमचा घोडा नदी सहज पार करु शकेल".*
*मुलाचा सल्ला मानुन त्या माणसाने नदी पार करण्यास सुरुवात केली. परंतु नदीच्या मध्यावर पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले की नदी खुप खोल आहे. आणि तो जवळ जवळ बुडायलाच आला.कसाबसा तो त्यातून सावरला आणि बाहेर येउन त्या मुलावर जोरात खेकसला. मुलगा पुरता घाबरला होता आणि घाबरत घाबरतच बोलला, "पण माझी बदके तर खुप लहान आहेत आणि ते दररोज नदी पार करतात. त्यांचे पाय तर तुमच्या घोड्यापेक्षा खुप लहान आहेत."*
*तात्पर्य : उगाच कोणाचाही सल्ला ऐकण्याआधी त्यांना खरोखरच काही माहीती आहे का ते जाणुन घ्यावे*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*अर्थ*
*एक पंडित स्वतःला फार मोठा विद्वान समजत असे. त्याच्या मनात विचार आला कि राजाच्या समक्ष राजपुरोहीताशी शास्त्रार्थ केला पाहिजे. मला कोणी हरवू शकत नाही याचा त्याला गर्व झाला होता. राजपुरोहिताला हरविले कि राजाला आपली विद्वत्ता माहित होईल आणि त्याद्वारे राजा आपणास बक्षीस पण देईल असे त्याच्या मनात होते. त्यानुसार ठरवून तो राजदरबारात गेला, त्याने पुरोहिताला शास्त्रार्थ करण्यासाठी आव्हान दिले. राजपुरोहीताने पंडिताला प्रथम प्रश्न विचारण्यास सांगितले, पंडिताने प्रश्न केला,"पाच मी, पाच शी, पाच न मी आणि पाच न शी याचा अर्थ सांगा?" राजपुरोहीताला प्रश्न समजला नाही. त्याने राज्याची प्रतिष्ठा राखण्यासाठी ७ दिवसांची मुदत मागून घेतली.*
*राजाने मुदत दिली मात्र सात दिवसानंतर मृत्युदंड कबुल असेल तरच. सात दिवसात पुरोहिताने उत्तर शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण बुद्धीने,नशिबाने साथ दिली नाही. मोठमोठ्या विद्वानांना हि या प्रश्नाचे उत्तर विचारून पाहिले पण त्यानाही यातील कुट शोधता आले नाही. राजपुरोहिताने विचाराची दिशा सोडून दिली, आता फक्त मृत्यूचा विचार तो करत होता. मृत्युच्या भीतीने त्याने नगर सोडून दिले, गावाबाहेर चालत राहिला, चालून चालून थकला तेंव्हा एका झोपडीपाशी जावून बसला. योगायोगाने ती झोपडी त्या पंडिताची होती आणि तो आपल्या पत्नीशी बोलत होता. पंडित बायकोला प्रश्नाचे उत्तर सांगत होता,"माझ्या प्रश्नाचे उत्तर न देता आल्याने राजपुरोहित मरणार हे खरे ! अगं ! पंधरा तिथीमध्ये पाच तिथी अशा असतात कि त्यांच्या पुढे 'मी' प्रत्यय लागतो -पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी आणि दशमी तसेच पाच तिथी अशा असतात ज्यामध्ये 'शी' प्रत्यय लागतो-एकादशी,द्वादशी,त्रयोदशी,चतुर्दशी आणि पुर्णमाशी आणि पाच तिथीमध्ये मीही लागत नाही आणि शी हा प्रत्यय लागत नाही-प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी आणि षष्ठी. बघ हे उत्तर राजपुरोहीताला कधीच येणार नाही." हे बाहेरून पुरोहिताने ऐकले आणि दुसऱ्या दिवशी दरबारात उत्तर दिले व स्वत:चा जीव वाचविला. अहंकारी पंडिताला राजाने दंड केला.*
*तात्पर्य- दुसऱ्याला कधीही कमी लेखू नये कारण आपण या ना त्या प्रकारे त्या अवस्थेत जावू शकतो.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*विजय असो*
*एकदा एका गावात दोन कोंबड्यांची झुंज सुरु झाली. भांडणाचे कारणही तसे भारीच होते, एका कोंबडीशी कुणी लग्न करायचे यावरून त्या दोघांत खूप भांडणे झाली व त्याचे पर्यवसान झुंजीत झाले. अटीतटीच्या झुंजीत दोघेही एकमेकांवर प्रहार करू लागले.*
*मारामारीत दोघांचेही अंग रक्तबंबाळ झाले, त्यातील एकाने मग रक्तबंबाळ झाल्याने सरळ पळून जाऊन आपल्या खुराड्याचा आधार घेतला व तिथूनच तो आणि ती कोंबडी बाहेर काय चालले आहे हे पाहू लागले.*
*भांडणात खुराड्याच्या बाहेर असलेल्या कोंबड्याला हा आपला विजय वाटून त्याने घराचे छत गाठले व तिथून जोरजोराने त्या कोंबडीकडे बघून ''मी जिंकलो, मी जिंकलो'' असे ओरडू लागला, स्वत:चाच जयघोष करू लागला.*
*तेवढ्या वरून एक गरूड आला व त्याने त्या ओरडणा-या कोंबड्याला उचलले व लांब जाऊन त्याने त्याला मारून खाऊन टाकले. हे पाहिल्यावर पराभूत झालेला कोंबडा व कोंबडी बाहेर आले तेव्हा तो कोंबडा कोंबडीला म्हणाला,''मी जर बाहेर राहिलो असतो तर त्या कोंबड्यासारखीच माझी हालत झाली असती. मी माझ्या जीवाला जसा जपतो तसाच तुलाही जपेन.''*
*तात्पर्य: ज्याच्या डोक्यात यशाची हवा चढते तेव्हाच त्याच्या पराजयाची सुरुवात होते. यश पचविता येणे ही एक मोठी गोष्ट आहे.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🔫शिकारी, 🦊कोल्हा व वाघ🐅*
*एका शिकार्याने रानात एक कोल्हा पाहिला. तो इतका सुंदर दिसत होता की, त्याचे कातडे आपल्याजवळ असावे अशी त्या शिकार्याला इच्छा झाली. त्याने त्या कोल्ह्याचे बीळ शोधून काढले व त्या बिळाच्या तोंडापुढे एक खड्डा खणला. नंतर त्या खड्ड्यात काही वाळलेली झुडपे घातली व त्यावर मोठा मांसाचा तुकडा ठेवला. कोल्हा तो मांसाचा तुकडा पाहून तेथे येईल व खड्ड्यात पडेल असे त्याला वाटले. सर्व तयारीनंतर तो शिकारी एका झाडापाठीमागे लपून बसला. थोडया वेळाने कोल्हा बाहेर आला व समोरच असलेला मांसाचा तुकडा पाहून तो खावा असे त्याला वाटले; पण त्यात काहीतरी कट असावा असे वाटून तो पुन्हा आपल्या बिळात जाऊन बसला. इतक्यात एक वाघ तेथे आला. काही विचार न करता त्याने त्या मांसाच्या तुकड्यावर झडप घातली व तो खड्ड्यात पडला. त्याच्या पडण्याचा आवाज त्या शिकार्याने ऐकला व तो धावत तेथे गेला. खड्ड्यात कोल्हा पडला असे समजून त्याने खड्ड्यात उडी मारली, तेव्हा वाघाने त्याला फाडून खाल्ले.*
*तात्पर्य :अविचाराने नेहमी अनर्थ घडत असतात.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*📚 चंडकौशिक 📚
💢 एक तपस्वी जंगलात आपल्या शिष्यांना शिक्षण देत होता. परंतु तो अत्यंत क्रोधी स्वभावाचा होता. एकेदिवशी तो रागाने आपल्या शिष्याला मारायला धावला मात्र तो मार्गात असलेल्या एका खांबाला धडकला आणि त्याचा मृत्यू झाला. मृत्युनंतर तो आपल्या तपोबलाच्या जोरावर पुन्हा जिवंत झाला. त्याचे नाव होते चंडकौशिक. त्याच्या आश्रमाच्या बगिच्यात फूल तोडण्यासाठी काही लोक घुसले होते. चंडकौशिकला हे समजले तेव्हा तो तात्काळ तेथे गेला. त्याला पाहताच लोक पळून गेले. चंडकौशिकला प्रचंड राग आला होता. तो कु-हाड घेऊन त्यांना मारायला धावला मात्र रागाच्या आवेशात येऊन विहीरीत पडला आणि त्याचा मृत्यू झाला. प्रचंड रागाच्या काळात मृत्यु होण्याच्या
कारणांमुळे तो पुढच्या जन्मात तो भयानक विषारी साप बनला. भीतीपोटी लोकांनी तो ज्या वनात आहे तेथे जाणेच सोडून दिले. एकदा भगवान महावीर त्या जंगलात आले.
लोकांनी त्यांना त्या वनात न जाण्याची विनंती केली. परंतु ते निर्भिडपणे गेले. महावीरांना पाहताच सापाने फुत्कारणे सुरु केले. परंतु महावीर त्याच्या बिळापाशी उभे राहिले. क्षमा आणि क्रोधाचा संघर्ष सुरु झाला. सापाने महावीरांच्या पायाचा कडाडून चावा घेतला. तर तेथून दुधाची धार सुरु झाली. साप हरला. तेव्हा महावीरांनी त्याला समजावले, ‘’ मित्रा, आता जरा जागा हो. जरा विचार कर, प्रत्येक जन्मात तू क्रोधाने इतरांना त्रास दिला आणि त्याबरोबरच स्वत:चेही नुकसान करून घेतले. क्रोधाने तुला काहीच मिळाले नाही उलट तू जे काही पुण्याईने मिळवले होते ते सोडून तुला पुन्हा जन्म घ्यावा लागला. क्रोधाने कमाविता येत नाही तर गमाविले जाते.’’ चंडकौशिक या बोलण्याने भारावून गेला आणि त्याने महावीरांची क्षमा मागितली. त्या दिवसापासून त्याच्या वृत्तीत फरक पडला \
===========================================
तात्पर्य- क्रोध ही तामसी वृत्ती आहे तर जीवनाचा आनंद सात्विकतेत आहे. रागाचा त्याग करणे हे मानवी जीवनाचे भूषण आहे.
*📚भिक्षु आणि राजा 📚*━━━━━━━━━━━━━━━━
💢 एक राजा नेहमी उदास राहायचा. लाखो प्रयत्न करून त्याला शांतता मिळत नसे. त्याच्या नगरात एक भिक्षु आला भिक्षूच्या ज्ञानपूर्ण उपदेशाने राजा प्रभावित झाला त्याने भिक्षूला विचारले." मी राजा आहे, माझ्याकडे सर्व काही आहे पण मनाला शांतता मिळत नाही. मी काय करायला हवे?" भिक्षु म्हणाले,"आपण एकांतात बसून चिंतन करा." राजा दुसऱ्याच दिवशी आपल्या कक्षात आसन घालून बसला. तेव्हा महालाचा एक कर्मचारी सफाई साठी तिकडे आला. राजाशी तो चर्चा करू लागला. कर्मचाऱ्याला राजाने त्याची समस्या विचारली. ती ऐकून राजाचे हृदय भरून आले. त्यानंतर राजाने प्रत्येक कर्मचाऱ्याचे कष्ट व दु:ख जाणून घेतले. सर्वांची व्यथा जाणून घेतल्यावर राजाला समजले कि कमी वेतनामुळे सर्व कर्मचारी त्रस्त आहेत.
राजाने त्यांच्या वेतनात वाढ केली. त्यामुळे ते खुश झाले. त्यांनी राजाचे आभार मानले. दुसऱ्या दिवशी राजाची भिक्षुशी भेट झाली. तेंव्हा भिक्षूने विचारले," राजन! आपल्याला काही शांतता मिळाली का?’’ राजा म्हणाला,’’ मला पूर्णपणे शांतता मिळाली नाही पण जेव्हापासून मी मनुष्याच्या दु:खाचे स्वरूप जाणले तेव्हापासून अशांतता थोडी थोडी कमी होत आहे.’’ तेव्हा भिक्षुने समजावले,’’ राजन, आपण आपला शांततेचा मार्ग शोधला आहे. बस्स, त्या मार्गाने पुढे जा, एक राजा तेव्हाच प्रसन्न राहू शकतो जेव्हा त्याची प्रजा सुखी असेल.’’
तात्पर्य – दुस-याचे दु:ख समजून घेण्यातच खरी शांतता लाभते. दुस-याच्या आनंदात जसे सहभागी होता येते तसे दु:खातही सहभागी व्हावे. त्याचे दु:ख कमी करता आले तर आपल्या मनाला शांतता मिळते. सहकार्य महत्वाचे आहे.
*परोपकार*
*एका गावात एक निर्धन मनुष्य राहत होता. परिस्थिती गरीबीची असूनही तो मनाने उदार होता. आपल्या घासातील घास देण्यासही तो कमी पडत नसे. एकदा एका शेठजीकडे तो जेवावयास गेला असताना त्या शेठजीने त्याला पंचपक्वान्नाचे ताट वाढून दिले. ती भरगच्च पदार्थांनी भरलेली थाळी बघून त्या गरीबाला वाटले की यातून किमान तीन माणसांची भूक भागू शकेल. त्याने शेठजीची परवानगी मागितली व त्यातील अन्न त्याने बरोबर घेतले व घराकडे जाण्यास निघाला. रस्त्यात त्याला एक भिकारी भेटला त्याला त्याने खायला दिले. त्यातून उरलेले अन्न घेऊन तो घरी आला, तो जेवायला बसणार इतक्यात एक भिक्षुक या माणसाच्या घरी आला व त्याने त्याला अन्नदान करण्याची विनंती केली. गरीबाने त्याच्यासमोरील ताट त्या भिक्षुकाच्या स्वाधीन केले.*
*त्यानंतर अजून एक अपंग व्यक्ती दाराशी आली त्यानेही या गरीबाकडे अन्न मागितले त्यालाही याने आपल्या थाळीतील अन्न खायला दिले. आता याच्याकडे देण्यासारखे काहीच शिल्लक राहिले नाही तेव्हा याने स्वत:ची भूक भागविण्यासाठी एक भांडेभर पाणी घेतले तर समोरून एक वृद्ध व्यक्ती आली व तिने ते पाणी पिण्यासाठी मागितले. याला आता खाण्यापिण्यासारखे काहीच उरले नाही तरीही ही व्यक्ती समाधानात होती आजचा दिवस आपल्यामुळे किमान चार लोकांना तरी खाण्यापिण्यास मिळाले. तो ह्याच विचारात असताना तेथे देव प्रगटले व म्हणाले,'मी तुझी परीक्षा घेण्यासाठीच भिकारी, भिक्षुक, अपंग आणि वृद्ध व्यक्तिचे रूप घेतले होते व तुझ्याकडून काही ना काही मिळते का नाही हे पाहिले आणि तु स्वत:चा विचार न करता दुस-याचा जीव जाणून घेतलास व देत राहिलास. आता या पुढे तुला काहीच कमी पडणार नाही असा मी तुला वर देतो.'' इतके बोलून देव अंतर्धान पावले.*
*तात्पर्य: देण्यातच खरे सुख लपलेले आहे. कुणाचाही घास हिरावून घेण्यापेक्षा कुणाला तरी एखादा घास देता कसा येईल याचा विचार करणे यातच खरे सुख लपलेले आहे.*
➖➖➖➖➖➖➖➖
*ओळख*
*राजाचे आगमन झाले होते, लोक रांगेत उभे होते, राजांच्या मनात प्रजेबाबत आस्था होती कारण तो राजा प्रजेचे हित जाणणारा होता. राजाच्या रथाच्या पुढे मंत्री, सेनापती आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे रथ होते. सर्वात पुढे सैनिक गर्दीला नियंत्रित करीत होते. या जनसमुदायामध्ये एक अंध संन्यासी पण उभा होता. त्याला या अद्भुत सोहळ्याचा आनंद घ्यायचा होता. त्यामुळे तो रांगेतून बाजूला उभा होता. जेंव्हा वाजंत्रीवाले जवळ आले, तेंव्हा सैनिक ओरडू लागले, "सरका ! दूर व्हा! बाजूला व्हा!" अंध संन्यासी म्हणाला,"समजले !" मंत्र्याचा रथ आल्यावरही त्याने संन्याशासहित सर्वाना तसाच दूर होण्याचा आदेश सुनावला. संन्याशी परत उत्तरले,"समजले". असेच सर्व सेनापतीचे रथ येताना झाले, त्यावेळेसही सैनिकाचे आणि संन्याशाचे वरीलप्रमाणेच म्हणणे आले.*
*सर्वात शेवटी राजाचा रथ आला. संन्याशाला पाहताच राजा तत्काळ रथाच्या खाली उतरला आणि त्यांच्या पाया पडत म्हणाला,"आपण या गर्दीत येण्याचे का बरे कष्ट घेतले? आपण जर आज्ञा केली असती तर मी तुमच्या आश्रमात येवून तुमची भेट घेतली असती." संन्याशी या वेळीही म्हणाला,"समजले !!" राजाने संन्यासी वृद्धाला विचारले,"महाराज ! मी फारसे काही न बोलता आपण समजले असे म्हणता?" तेंव्हा संन्यासी म्हणाले,"आपल्या या सर्व लवाजम्यात मी फक्त आवाजावरून, उच्चारावरून आणि बोलण्याच्या पद्धतीवरून काही निष्कर्ष काढले, ते माझे बरोबर आले त्याला मी समजले म्हणत होतो. सैनिकाचा, सेनापतीचा,मंत्र्याचा वेळेचा सूर हा वेगळा होता आणि मृदू आवाज हा केवळ राजाचा असू शकतो याची मला खात्री होती. राजा मनातून काय समजायचे ते समजला. त्याने त्या अंध संन्याशाला रथातून आश्रमात सोडण्याची व्यवस्था केली.*
*तात्पर्य-विनम्रतेतून महानता प्रकट होत असते. त्यामुळे कितीही उंची मिळाली तरी अहंकारापासून दूर राहता आले पाहिजे.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*📚 कृती📚*
💢 एका गावात एक गरीब माणूस राहत होता शिक्षण नाही त्यामुळे कोणते चांगले कामही मिळत नव्हते, तो भिक्षा मागून आपले पोट भरत होता. एके दिवशी त्याला भिक्षेच्या रुपात तांदूळ मिळाले, तांदूळ त्याला फार दिवसांनी मिळाले होते. तो फार आनंदी होता. दुसऱ्या एका घरातून त्याला भाकरी आणि भाजी मिळाली. त्याने ती भाजीभाकरी खाल्ली आणि तांदूळ एका मडक्यात भरून भिंतीला असलेल्या खुंटीला अडकवून ठेवले. तो खाटेवर पडून आराम करू लागला.मडक्याला पाहून तो विचार करू लागला, त्यात आज तांदूळ आहेत. उद्याही तांदूळ मिळाले तर मडके अर्धे भरून जाईल, आणि असे जर तांदूळ मिळताच राहिले तर काही दिवसातच मडके तांदळाने भरून जाईल.मग आपण तांदळासाठी अशी ४-५ मडकी करू. २-३ महिन्यानंतर एक लहान पोतेभर तांदूळ जमा झाले कि ते तांदूळ आपण विकून टाकू. त्यातून पैसा मिळेल मग आपण अजून तांदूळ खरेदी करू ते जास्त भावाने विकू त्यात पैसा मिळेल असे करता करता आपल्याला भरपूर पैसा मिळू लागेल. पैसा जमा झाला कि आपण लग्न करू, मग मुले होतील, ती सुंदर आणि खोडकर असतील. मुलांना मी चांगले संस्कार करेन, त्यांनी जर ऐकले नाही तर तर त्यांना लाथ मारेन, असे विचार करत असताना त्याने खरोखरीच एक लाथ हवेत मारली आणि त्याच्या दुर्दैवाने ती लाथ तांदळाच्या मडक्याला बसली. त्याबरोबर ते मडके लाथेने हवेत भिरकावले गेले आणि मडके खाली पडून फुटले. त्यातील सगळे तांदूळ घरात साचलेल्या घाणेरड्या जागेत पडले. त्यासोबतच त्याचे स्वप्न भंग पावले.
तात्पर्य-कृती महत्वाची आहे. कृती आणि विचार यात जर साम्य नसेल तर हानी होते. जे विचारात आहे तेच कृतीत असायला हवे
*
*मूर्खांचे निष्कर्ष*
*एका खगोलशास्त्रज्ञाने दुर्बिणीतून सूर्याचे निरीक्षण केले. त्याला निरीक्षणातून असे कळून आले की सूर्यावर प्रचंड मोठा प्राणी आहे व आपण खूप मोठा शोध लावला या समजूतीने तो लोकांना जमवून त्या शोधाची माहिती सांगू लागला की '' सूर्य प्रचंड उष्ण तारा असूनही त्यावर एक प्राणी जीवंत राहतो आणि तुम्ही सगळे आता घाबरून राहा जर तो प्राणी पृथ्वीवर आला तर पृथ्वीचे काय होईल हे पहा.'' खगोलशास्त्रज्ञाच्या या बोलण्यावर काही लोकांचा खरेच विश्वास बसला व त्यांच्यापैकी काही लोकांनी त्याचा सत्कार करण्याचे ठरविले.*
*पण जमलेल्या काही लोकांपैकी एक जण चिकित्सक होता त्याने त्या ज्योतिष्याची दुर्बिण तपासायचे ठरविले व त्याने ती दुर्बिण तपासली असता त्याच्या लक्षात आले की महाकाय प्राणी हा सूर्यावर नसून एक माशी दुर्बिणीच्या काचेवर अडकून पडली आहे आणि सूर्याकडे पाहताना ती माशी म्हणजे महाकाय प्राणी असल्याचा भास होत होता. चिकित्सक माणसाने ही गोष्ट लोकांना सांगताच त्यांना शास्त्रज्ञाचा मूर्खपणा लक्षात आला.*
*तात्पर्य: जे लोक मूर्खपणाने किंवा उतावीळपणे बेछूट विधाने करतात किंवा सारासार विचार न करता, पुढचामागचा विचार न करता बोलत राहतात असे लोक कधी ना कधी तोंडावर आपटतात. त्यांचा पराभव हा निश्चित ठरलेला असतो.*
* 📚 वाद नको 📚*
💢 गाढव वाघाला सांगतो की, गवत पिवळे असते.
वाघ गाढवाला सांगतो की, गवत हिरवे असते. त्यांच्यात वाद होतो. ते दोघे निवाडा करायला सिंहाकडे जातात.
दरबारात सर्व जमलेले असतात. गाढव शहाणपणा करत सर्वांच्या समोर सिंहाला सांगतो की, गवत पिवळे असते आणि हा वाघ बोलतो की ,गवत हिरवे असते.तुम्हीच आता सांगा की ,खर काय आणि खोट काय?
सिंह स्मितहास्य करतो 😀आणि सर्वांच्या समोर सांगतो की, गाढव बरोबर सांगत आहे.गवत पिवळे असते.
आणि सिंह वाघाला एक महिन्याची शिक्षा करतो.
गाढव आनंदाने उड्या मारत जंगलात निघून जातो.😀
सर्व दरबार संपल्यावर वाघ जाऊन सिंहाला विचारतो की ,तुम्हाला माहित आहे ना की ,गवत हिरवं असतं .
तरीही मला का शिक्षा केली??
सिंह बोलला की, मी शिक्षा तुला यासाठी केली की, तो गाढव आहे हे सर्वांना माहीत आहे आणि गवत हिरवंच आहे, ह्यात काहीच शंका नाही. पण तरीही तू एका गाढवा बरोबर वाद घालत बसून स्वतःच वेळ वाया घालवलास ..म्हणून तुला शिक्षा दिली...
😜😄😄
*Moral of the Story* : ध्येय गाठायच असेल तर, आपल्या कामात अडथळे निर्माण कारणाऱ्यांकडे लक्ष न देता, ध्येयपूर्तीसाठी काम करावे.कारण शेवटी ध्येय महत्वाचं आहे..!☝
*लाडूची चोरी*
*पूर्वीच्या काळची गोष्ट आहे, दोन तरूण एका मिठाईच्या दुकानात गेले, दुकानदाराचे लक्ष दुसरीकडे आहेसे पाहून त्यातल्या एका मुलाने जवळच असलेल्या एका थाळीतील एक लाडू उचलला आणि दुस-या मुलाच्या हाती दिला, त्याने तो लाडू पटकन खिशात टाकला, थाळीतील एक लाडू कमी झाल्याचे लक्षात येताच तो हलवाई त्या तरूणांना म्हणाला,''तुम्ही दोघेचजण इथे आहात तेव्हा तुम्हां दोघांपैकीच कोणीतरी एकाने तो लाडू चोरला आहे,''*
*यावर प्रत्यक्षात लाडू चोरणारा तरूण म्हणाला,''देवाशप्पथ, मी खरं सांगतो की लाडू माझ्याकडे नाही.'' ज्याच्या खिशात तो लाडू होता, तो तरूण म्हणाला,'' देवाशप्पथ खरंच सांगतो मी लाडू मुळी चोरलेला नाही.'' दुकानदाराला खरे काय ते माहित असूनही केवळ यांच्या भाषिक कसरतीमुळे त्यांची चोरी सिद्ध करू शकला नाही.*
*तात्पर्य: भाषेच्या कसरतीमुळे एखादा इसम निरपराधी असल्याचे सिद्ध करता आले नाही तरी प्रत्यक्षात तो अपराधी असू शकतो.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📚. मित्र 📚*.
💢 विनोद आणि अजय यांची खूप चांगली मैत्री होती. ते एकाच वर्गात शिकत होते. विनोद मन लावून शिकायचा पण अजयचे मन मात्र सदैव इकडे तिकडे नेहमीच भरकटलेले असायचे. वर्गात शिक्षक शिकवत असताना अजयला नेहमी बोलणी खावी लागायची ती ह्याच लक्ष न देण्याच्या कारणावरून पण विनोद मात्र नेहमीच अभ्यासात पुढे राहायचा व शाबासकी मिळवायचा.एके दिवशी विज्ञानाचे शिक्षक वर्गात शिकवीत होते. त्यांनी विद्यार्थ्यांना वहीमध्ये गृहपाठ करण्याची एक पद्धत सांगितली होती. त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांनी गृहपाठ पूर्ण केला होता.पण अजयने मात्र आपल्या सवयीनुसार गृहपाठ व्यवस्थित पूर्ण केला नव्हता. त्याची वही पाहून शिक्षक रागाने त्याला म्हणाले,"हे तू काय केले आहेस? मी तर पानाच्या एका बाजूनेच लिहायला सांगितले होते पण तू दोन्ही बाजूने लिहीले आहेस." आता अजय घाबरला.
कारण शिक्षकांनी त्या दिवशी सुट्टी होण्याच्या आत वही पूर्ण करायला सांगितले होते आणि सुट्टी होण्यास फक्त दोनच तास राहिले होते. अजयला घाबरलेल्या अवस्थेत पाहून विनोदने त्याला त्याच्या लक्ष न देण्याच्या सवयीबद्दल उपदेश केला व शिक्षकांकडून परवानगी घेवून बाजारात जावून नवीन वही आणली. इतकेच नाही तर अजयसोबत बसून त्याचा गृहपाठ पूर्ण केला आणि त्याची वही शिक्षकांकडे जमा केली. त्या दिवसापासून अजयने आपल्या स्वभावात बदल केला आणि तो कोणतेही ठिकाणी लक्षपूर्वक काम करू लागला.
तात्पर्य- लक्षपूर्वक काम करणे आणि विवेकबुद्धी जागृत ठेवून काम करणे या दोन गोष्टी पाळल्यास अनेक संकटावर मात करता येते. तसेच होणारे नुकसान टाळता येते.
*घामाचा पैसा*
*एका शेठजींचा मुलगा, अज्जू खूप आळशी होता. घरात गडगंज संपत्ती आणि एकुलता एक म्हणून लाडका. काम त्याला कधी करावे लागलेच नाही. असे करत करत तो एकवीस वर्षांचा झाला. शेठजींना लागली काळजी. साठवलेला पैसा किती दिवस पुरणार? दुसर्याच दिवशी त्यांनी मुलाला बोलावले बाहेर पडायला सांगितले. पैसा कमवून आणलं तर जेवायला मिळेल ही अट ठेवली.*
*अज्जूला काहीच कळेना. त्याने बहिणीकडून एक रूपया मागितला. आणि दिला जाऊन शेठजींना. पण तो त्यांनी विहीरीत फेकला. दुसर्या दिवशी पुन्हा हीच अट ठेवली. आता अज्जू आईकडे गेला. तोही पैसा वडिलांनी फेकला. आता मात्र आला तिसरा दिवस. अज्जू दिवसभर काम शोधत फिरला. पण काम काही मिळेना. हताश होऊन गेला. काहीच सुचेना. पोटात लागले कावळे कोकलायला. शेवटी स्टेशनवर एक माणूस हमालाची वाट पहात असलेला दिसला.*
*हे पाहताक्षणीच अज्जू धावत सुटला आणि बॅग त्याने डोक्यावर उचलून त्याच्या घरी पोहचवली. एवढे करेपर्यंत घामाघुम झाला. पण त्या माणसाने अज्जूच्या हातावर टेकवले फक्त आठ आणे. शेठजींच्या हातावर आठ आणे ठेवताच त्यांनी ते विहिरीत फेकले. वडिलांच्या या कृतीने अज्जू संतापला. म्हणाला, बाबा तुम्हाला जाणीव नाही की ते आठ आणे मिळवायला मला किती वणवण करावी लागली. शेठजी हसत हसत म्हणाले, हेच मला हवे होते. आज तुला खर्या कष्टाची किंमत कळली.*
*तात्पर्य: स्वकष्टाची कमाई तीच खरी कमाई.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
―: दृष्टिकोन :―
―★―
माणसं कमावण्याची जबरदस्त नशा असते वयाच्या एका टप्प्यापर्यंत.आपल्यापैकी अनेकांना ती असते. माणसं जोडणं ही छानच गोष्ट, अनेकांसाठी ती एक अभिमानाची बाब असते. जरूर असावी. चांगला स्वभाव आणि उत्तम चारित्र्य याच्या जोरावर अनेक माणसं जोडावीत, जपावीत. पण हे करताना ही जपलेली माणसं आपल्यालाही 'जपत' आहेत ना हे बघणं फार महत्त्वाचं असतं. अनेकदा आपल्याला वाटून जातं, अरे बापरे...! ही अमुक इतकी 'भारी' व्यक्ती आपल्यासोबत संपर्क ठेवून आहे. म्हणजे किती छान! त्या संपर्कामागे विशुद्ध भाव आहे ना, की पुढे जाऊन आपला 'स्टेपणी' म्हणून उपयोग केला जाणार आहे हे बघायला हवं. अशा अनेक अनुभवांतून आपण जात असतो, त्यामुळे 'हुरळून' जाणं टाळायला हवं.
तुम्हाला माणसं जोडावीशी वाटतात हा तुमचा चांगुलपणा असतो, पण त्याला तुमचा भावनिक कमकुवत पणा समजणारे खूप लोक असतात. त्यामुळे आपल्या चांगुलपणाचं इतकंही प्रदर्शन करू नये की तो संशयास्पद वाटू लागेल.
अनेकदा एखादी व्यक्ती आपल्याला अत्यंत जवळची, जिवलग वाटत असते, आपली सुख दुःखं आपण तिला सांगत असतो. पण आपल्या वेदनांचा वापर पुढे ती आपलं मन:स्वास्थ्य उद्ध्वस्त करणारा दारुगोळा म्हणून देखील करू शकते. माणसांना इतकंही पोटाशी धरू नये की ते पुढे आपल्यावर लाडाने दुगाण्या झाडू लागतील. माणसं जोडताना कोणाला कोणत्या पायरीपर्यंत जवळ येऊ द्यावं हे ठरवून घ्यायला हवं. लायकी नसलेल्या एखाद्या व्यक्तीला फार जवळ केल्याचा अतोनात त्रास आयुष्यभर भोगावा लागू शकतो.
लोक तुम्हाला खांदा द्यायला नसतात बसलेले, अनेकदा तुम्ही रडण्यासाठी त्यांचा खांदा जवळ करता, हे त्यांना एंटरटेनिंग वाटू शकतं. दुःखावर बांधावीत अशी माणसं फार विरळा असतात. मन मोठं करून समोरच्याला मदत करणं, त्याचं चांगलं व्हावं यासाठी प्रयत्न करणारी भली माणसं जगात आहेत, नक्कीच आहेत. पण भसाभस माणसं जमवण्याच्या नादात दाण्यांपेक्षा बणग्याच जास्त गोळा होतात. त्यातली एखादी आयुष्यभर कुसळा सारखी टोचत राहते, असह्य वेदना देते.
भारावून जाणं' ही एक फारच भाबडी गोष्ट आहे.कोणाच्या एवढ्या तेवढ्या गोष्टीने भारावून जाणारी माणसं आपल्यात असतात. फार जवळ जाऊन बघितलं की समोरच्या माणसाचे पायही मातीचे आहेेत हे लक्षात येतं आणि अतोनात निराशा वाट्याला येते. माणसांतलं चांगलं ते जरूर वेचावं, त्याचं कौतुक करावं,जमल्यास आचरणात ही आणावं.
काही माणसं समोरून फार छान वाटतात, आदर्श वाटतात. आपण त्यांना आपलं मानत राहतो, फॉलो करत राहतो. आणि एका विवक्षित क्षणी कळतं, की काहीही घेणं देणं नसताना ही माणसं आपल्या सोबत किती खोटं, कृतक वागत होती, मागे डावपेच करत होती.मग जीव उबतो, त्या नात्याची शिसारी येऊ लागते. यावर पर्याय काय? 'माणसांच्या फार जवळ न जाणे'. लांबून जे दिसतं त्यात आनंद मानावा. माणसं आपल्या समोर जे वागतात, बोलतात ते आणि तेवढंच खरं मानून पुढे निघावं, फार खोलात जाऊन गोष्टी जाणून घेण्याचा हट्ट करू नये. अपेक्षा भंग वाट्याला येतो.
माणसं कमावणं म्हणजे त्यांना आपल्या आयुष्यात हस्तक्षेप करण्याचे अधिकार देणं नव्हे. काही व्यक्ती आपले पणाच्या हक्काने काही गोष्टी सांगत असतात. त्या नम्रपणे ऐकून घेण्याची क्षमता ठेवावी.चार कटू गोष्टी ऐकाव्या लागल्या तरी त्यातून पुढे आपला भलंच होणार आहे हे आपण जाणून असावं. अर्थात आपलं खरोखरच भलं व्हावं म्हणून स्वतःचा वेळ देऊन आपला कान पकडणारं कोण आणि आपलं भलं पाहून पोटदुखी होणारे कोण यातला फरक आपल्याला ओळखता यायला हवा.
माणसं जरूर जोडावीत, जपावीत,एकमेकांच्या भावना आपल्याला दुखावू शकेल इतके अधिकार कोणाला देऊ नयेत. जगायला माणसं लागतातच, पण 'आतल्या' वर्तुळात कोणती माणसे घ्यायची आणि 'बाहेरच्या' वर्तुळात कोणती माणसं ठेवायची याचं गणित एकदा जमायला लागलं की सोपं होतं जगणं.
*📚शेवटी मी आई आहे ! 📚*━━━━━━━━━━━━━━━━
💢 एलीस हि महाराणी व्हिक्टोरिया यांची मुलगी होती. लग्नानंतर तिला मुलगा झाला. मुलाची देखभाल करण्यासाठी राजवाड्यात नोकर-चाकरांची काही कमी नव्हती. तरीही एलीस लहान बाळाची खूप काळजी घेत असे. सतत त्याच्या सोबत राहून ती त्याची देखभाल करीत असे. तो क्षणभर जरी दृष्टीआड झाला तरी तिला चैन पडत नसे. तिचा मुलगा मग १० वर्षाचा झाला. एके दिवशी त्याला संसर्गजन्य रोगाची लागण झाली. तज्ञानी त्याच्यावर उपचार सुरु केले. डॉक्टरांनी तपासणी करून सल्ला दिला कि काही दिवस सर्वांनी याच्यापासून दूर राहावे कारण हा अतिशय जीवघेणा संसर्ग असून तो श्वासोच्छवासाद्वारे फैलावू शकतो. त्यामुळे त्याच्या संपर्कात कुणीही येवू नये. या डॉक्टरांच्या सांगण्यामुळे सर्व नोकरांमध्ये भीती पसरली. कोणीही नोकरचाकर किंवा कुणीच त्याच्या खोलीत जायला तयार नसे. परंतु एलीसने त्या परिस्थितीतही मुलाला एकटे सोडले नाही.ती त्याची सेवा करतच राहिली.एके दिवशी मुलगा म्हणाला,"आई ! बरेच दिवस झाले तू माझी पापी घेतली नाही, मला कुशीत घेतले नाही." शेवटी आईचेच हृदय ते !! एलीसने मुलाला जवळ घेतले व मायेने त्याला कुरवाळले, त्याची पापी घेतली. बरेच वेळ ती त्याच्या सानिध्यात राहिली. नको तेच झाले, तिच्या मुलाच्या संपर्कात राहण्याने तीपण त्या रोगाच्या तावडीत सापडली. नंतर अनेकांनी तिला विचारले,"हा रोग जीवघेणा असतानासुद्धा व तुला ते माहित असताना ही तू मुलाला का जवळ केले? असे करणे म्हणजे वेडेपणा आहे असे तुला वाटले नाही का?" एलीसने उत्तर दिले,"मी आई आहे. मी माझ्या मुलाला तडफडत कसे एकटे सोडू? तो तळमळत होता आणि मी आनंदात कसे राहू? मला माझे बाळ महत्वाचे आहे."
शेवटी मुलासोबतच एलीसचेही निधन झाले. एलीसच्या समाधीवर इतकेच लिहिले होते,
===============================
""""""""""""" शेवटी मी आई आहे !!""""""""""""""""""
===============================
तात्पर्य-आई हे पृथ्वीतलावरचे ईश्वराचे रूप आहे. जे मुलांच्या सुखासाठी तळमळते, प्रसंगी जीवही देते, सर्वस्वाचा त्याग करते. त्या मातेला मग ती आपली असो किंवा दुसऱ्याची माता तिला दुखावले जाणार नाही याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे.
संकलन - अशोक शिंदे
No comments:
Post a Comment